भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ८.२ टक्क्यांवर

0
632

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी अर्थात विकास दर ८.२ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीतली ही आकडेवारी समोर आली आहे. एकीकडे नोटाबंदी, राफेल करार यावरून मोदी सरकारवर विरोधक तुटून पडलेले असताना ही बातमी समोर आली आहे. २०१७ मध्ये जीडीपी ७.७ टक्क्यांवर आला होता. नोटाबंदीमुळे विकासदर घसरला आणि अर्थव्यवस्था कोलमडली अशी टीका होत असतानाच विकास दर ८.२ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.

सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार अर्थव्यवस्थेतील एप्रिल ते जून या तिमाहीत विकास दरात मोठी वाढ झाली आहे. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर विकासदरात घसरण झाली होती. मात्र आता या तिमाहीत विकासदराने मोठी उसळी घेतली आहे. अर्थ तज्ज्ञांनी विकास दराबाबत जो अंदाज वर्तवला होता. त्यानुसार या तिमाहीचा विकास दर ७.५ टक्क्यांपर्यंत राहिल असे वाटत होते. मात्र विकास दराने उसळी घेतली आहे.

गुरूवारीच पत्रकार परिषद घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीचा निर्णय कसा चुकीचा होता, त्यामुळे बेरोजगारी वाढली. अनेकांचे रोजगार गेले, असे आरोप त्यांनी केले. तसेच नोटाबंदीचा निर्णय फक्त मोजक्या उद्योजकांसाठी घेण्यात आला असेही त्यांनी म्हटले होते. मात्र आता विकास दर ८.२ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.