भारताला पाठिंबा देणाऱ्या देशावरही क्षेपणास्त्र हल्ला करू; पाकिस्तानी नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

0
469

इस्लामाबाद, दि. ३० (पीसीबी) – पाकिस्तानचे नेते आणि वादग्रस्त वक्तव्य यांचे अनोखे नाते असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता पाकिस्तानच्या आणखी एका नेत्याने क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. “काश्मीर प्रकरणी जो देश भारताला पाठिंबा देईल, त्या देशावर क्षेपणास्त्र हल्ला केला जाईल,” अशी धमकी पाकिस्तानचे मंत्री अली अमीन गंडापुर यांनी दिली. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

“काश्मीरच्या मुद्द्यावर जर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढल्यास पाकिस्तानला नाईलाजानं युद्ध करावं लागेल. तसंच जो देश या प्रकरणी भारताचे समर्थन करेल त्याला आम्ही आमचे शत्रू मानू. भारताव्यतिरिक्त त्या देशावरही आम्ही क्षेपणास्त्र डागू,” असा इशारा अली अमीन यांनी दिला. पाकिस्तानातील पत्रकार नायला इनायत यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरल्याचे पहायला मिळत आहे. तसेच पाकिस्तानच्या अनेक मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्यही करण्यात येत आहेत.

यापूर्वी आपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेले पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी भारताचे नाव न घेता पुन्हा अणुहल्ल्याची धमकी दिली होती. “आता केवळ अण्विक युद्ध होईल, परंपरागत पद्धतीने युद्ध केले जाणार नाही,” असे रशीद म्हणाले होते. “आता ४-६ दिवस टँक, तोफा चालतील असे युद्ध केले जाणार नाही, आता केवळ अण्विक युद्ध होईल,” असे रशीद यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते. “यापूर्वी मी १२६ दिवस आंदोलनात सहभागी होतो. त्यावेळी देशातील परिस्थिती वेगळी होती. आता एअर टँकने हल्ला किंवा नौदलाकडून हल्ला केला जाणार नाही. आता केवळ अण्विक युद्ध होईल आणि ज्याप्रकारची गरज असेल त्या प्रकारे अण्विक हल्ला केला जाईल,” असेही त्यांनी नमूद केले होते.