Desh

भारताबरोबर युध्द झाल्यास पाकिस्तानाचा पराभव होईल; इम्रान खानची कबुली

By PCB Author

September 15, 2019

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – पाकिस्तानचे जर भारताबरोबर पारंपरिक युद्ध झाले,  तर यात पाकिस्तानला पराभव पत्करावा  लागेल.  तसेच या सर्वांचे परिणाम भयानक असतील, अशी कबुली देत पाकिस्तान कधीही अणु युद्धाची सुरुवात करणार नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.

काश्मीर मुद्यावरून भारताला अणवस्र हल्ल्याची धमकी दिल्याच्या मुद्द्यावर अल जजीरा या वृत्तवाहिनीने  विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना इम्रान खान बोलत होते.

यावेळी इम्रान खान  म्हणाले की,  मी एक शांतताप्रिय व्यक्ती आहे. मी युद्धाच्या विरोधात आहे. युद्धाने समस्या सुटणार नाहीत.  युद्धाचे अनपेक्षित परिणाम दिसतात. व्हिएतनाम, इराकच्या युद्धांना बघा, त्या युद्धांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, ज्या कदाचित युद्ध ज्यासाठी केले गेले त्याच्यापेक्षाही गंभीर आहेत.

युद्धात पराभवाच्या छायेत असलेल्या देशाकडे केवळ दोनच पर्याय असतील. त्यांनी आत्मसमर्पण करावे,  अन्यथा शेवट्च्या क्षणापर्यंत स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहवे.  अशावेळी पाकिस्तान शेवटपर्यंत लढेल आणि हेच कारण आहे की, जेव्हा एखादा अणवस्रधारी देश शेवटच्या क्षणापर्यंत लढतो,  तेव्हा परिणाम भयावह असतात.