भारताने आलेल्या कठिण आव्हानासमोर सलामीची जोडी गमावली

0
193

सिडनी, दि.१० (पीसीबी) : विजयासाठी ४०७ धावांच्या कठिण आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवस अखेरीस भारताने सलामीची जोडी गमावली. आता संथ खेळणाऱ्या चेतेश्वर पुजारासह कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यावर भारताच्या सामना वाचविण्याच्या आशा अवलंबून राहणार आहेत.

त्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव चहापानाच्या विश्रांतीला ६ बाद ३१२ अशा धावसंख्येवर ४०६ धावांची आघाडी घेऊन सोडला. मार्नस लाबुशेन, स्टिव स्मिथ आणि कॅमेरुन ग्रीन यांच्या ऐंशीतील खेळी ऑस्ट्रेलियाची ताकद दाखवणारी ठरली. त्यानंतर अखेरच्या सत्रात त्यांनी भारताची सलामीची जोडी तंबूत परत पाठवून सामन्याची सुत्रे आपल्या हाती कायम ठेवली. भारताच्या दुसऱ्या डावात २ बाद ९८ धावा झाल्या असून, त्यांना अजून ३०९ धावांची आवश्यकता आहे. चेतेश्वर पुजारा ९ आणि अजिंक्य रहाणे ४ धावांवर खेळत आहे.

पहिल्या डावात पुजाराच्या १७६ चेंडूंतीर ५० धावांच्या खेळीने त्याच्यावर टिका झाली होती. मात्र, आता उद्या अशाच खेळीची भारताला नितांत गरज असेल. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या ७१ धावांच्या खेळीने भारताची सुरवात आशादायक होती, तर ऑस्ट्रेलियाची चिंता वाढवणारी ठरली. मात्र, अखेरच्या टप्प्यात त्यांना सातत्य राखता आले नाही. हेझलवूडने गिलला यष्टिरक्षक पेनकरवी झेलबाद केले. या वेळी भारताने तिसऱ्या पंचाकडे दाद मागून एक रिव्ह्यू गमावला. त्यानंतर या वेी रोहित शर्माने अर्धशतक झळकावले, पण तो लेगच बाद झाला. पॅट कमिन्सने त्याला बाद केले.

खेळपट्टी आता वेगळी दिसू लागली आहे. चेंडू वेगाने उसळत आहेत. त्याचबरोबर खेळपट्टीवर पडलेले पॅचेस नॅथन लायनला नक्कीच खुणावत असतील. त्यामुळे दोन फलंदाज जखमी असताना भारताला आता फक्त आणि फक्त रहाणे-पुजारा जोडीवर अवलंबून रहावे लागणार आहे. रोहितचे कव्हर ड्राईव्ह, पूल, तर गिलचे स्ट्रेट ड्राईव लक्ष वेधून घेत होते.

आज भारताला तब्बल ५३ वर्षांनी ऑस्ट्रेलियात एकाच सामन्यात दोन्ही डावात अर्धशतकी सलामी मिळाली. त्यावेळी फरुख इंजिनियर आणि सईद अबिद अली यांनी सिडनीतच अशी कामगिरी केली होती.

त्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला आज खऱ्या अर्थाने सूर गवसला. स्मिथ (८१) दुसऱ्या शतकापासून वंचित राहिला. लाबुशेनही (७३) आपली खेळी करून गेला. त्याही सर्वात महत्वाचे म्हणजे कॅमेरुन ग्रीन याने १३२ चेंडूंत ८४ धावांची खेळी करताना आपली योग्यता सिद्ध केली. डावाला वेग देण्याची वेळ आली तेव्हा त्याने दाखवलेली आक्रमकता नक्कीच कौतुकास्पद ठरली. कर्णधार टिम पेन यानेही उपयुक्त खेळी केली. यांच्या प्रयत्नांमुळेच त्यांना ६ बाद ३१२ अशी मजल सहज शक्य झाली.

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज वर्चस्व गाजवत असतानाच पुन्हा एकदा सुमार क्षेत्ररक्षणाचे भारताच्या मर्यादा स्पष्ट केल्या. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी गली, स्लिप आणि स्क्वेअर लेगला झेल सोडले. शतकाच्या मार्गावर असणाऱ्या स्मिथला अश्विनने परतवले. चहापानापूर्वी काही काळ खेळ भारताच्या महंमद सिराजने पुन्हा एकदा प्रेक्षकांकडून चिडवण्याची तक्रार केल्याने थांबला होता. या प्रेक्षकांना स्टेडियममधून हाकलून दिल्यानंतरच खेळ पुढे सुरू झाला.

संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया ३८८ आणि ६ बाद ३१२ (कॅमेरुन ग्रीन ८४, स्टिव स्मिथ ८१, मार्नस लाबुशेन ७३, टिम पेन नाबाद ३९, आर. अश्विन २-५४) भारत २४४ आणि २ बाद ९८ (रोहित शर्मा ५२, शुभमन गिल ३१, पुजारा खेळत आहे ९, रहाणे खेळत आहे ४)