“भारतानेच श्रीलंकन खेळाडूंना धमकावले”; पाकच्या उलट्या बोंबा

0
421

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – श्रीलंका संघातील दहा खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान श्रीलंका संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या (एसएलसी) हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षेच्या कारणावरून श्रीलंकेच्या दहा खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. या निर्णयाबाबत पाकिस्तानच्या एका मंत्र्यांनी थेट भारताला जबाबदार धरले आहे.

“पाकिस्तान दौऱ्यावर जाऊ नका असं भारताकडून श्रीलंकन खेळाडूंना सांगितले जात आहे. तुम्ही पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली नाहीत, तर तुमची IPL मधून हकालपट्टी केली जाईल, असं भारताकडून त्या खेळाडूंना धमकावण्यात आले असल्याचे क्रीडा समालोचकांकडून मला समजले आहे. हे खूपच खेदजनक आहे. क्रीडा विभागापासून ते अंतराळ क्षेत्रातील स्पर्धेपर्यंत भारताच्या जळाऊवृत्तीचा निषेध केलाच पाहिजे. भारतीय क्रीडा विभागाची ही वागणुक अत्यंत चुकीच्या प्रकारची आहे”, असे आरोप पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी केले आहेत.

दरम्यान, श्रीलंकेच्या संघातील खेळाडूंपैकी दिमुथ करुणारत्ने, टी २० कर्णधार लसिथ मलिंगा आणि माजी कर्णधार अँजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल इत्यादी खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. खेळाडूंच्या कुटुंबीयांनी खेळाडूंच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली असल्याची माहिती श्रीलंकेचे क्रीडा मंत्री हेरिन फर्नांडो यांनी दिली. या दौऱ्यापासून पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरु व्हावं, असा पीसीबीचा प्रयत्न आहे. पण अद्याप तरी श्रीलंकन खेळाडू या दौऱ्यासाठी तयार नसल्याने या दौऱ्याबाबत संभ्रम कायम आहे.