Desh

भारतात लोकसभा निवडणुकीत रशियाकडून हस्तक्षेप  होण्याची शक्यता  

By PCB Author

August 03, 2018

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – भारतात २०१९ मध्ये  होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रशियाकडून हस्तक्षेप होण्याची शक्यता ऑक्सफर्ड तज्ञांनी वर्तवली आहे. भारत आणि ब्राझीलसह अन्य काही देशांमध्ये आगामी काळात निवडणूका होणार आहेत. माध्यमाच्या माध्यमातून रशिया या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करू शकते, असा दावा या तज्ञांनी अमेरिकी खासदारांसमोर बोलताना केला.

रशियाच्या हॅकर्स आणि गुप्तहेर यंत्रणांनी २०१६ मध्ये  अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करून डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून येण्यास मदत केली होती,  असाही आरोप करण्यात आला होता.

याप्रकरणी, अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयने १३ रशियन नागरिकांविरोधात काही दिवसांपूर्वी आरोप निश्चित केले आहेत. बेकायदेशीरपणे अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप या त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून धोका देणे आणि खोट्या ओळखीचा वापर करणे, अशा स्वरूपाचे आरोप तिघांवर ठेवण्यात आले आहेत. याशिवाय ३ रशियन कंपन्यांवरही आरोप ठेवण्यात आले आहेत.