‘भारतात क्रिकेटइतके महत्व अन्य खेळांना दिले जात नाही ही शोकांतिकाच’ – तापसी पन्नू

0
437

मुंबई, दि.११ (पीसीबी) – विविध धाटणीच्या चित्रपटांमधील आव्हानात्मक भूमिका साकारत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री तापसी पन्नू सध्या बरीच चर्चेत आहे. येत्या काळात ती एका हॉकीपटूच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, आता तिचे हे रुप चाहत्यांची मने जिंकणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘सूरमा’ या चित्रपटातून तापसी अभिनेता दिलजीत दोसांज याच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. हॉकीपटू संदीप सिंगच्या आयुष्यावर या चित्रपटाच्या कथानकाची पार्श्वभूमी आधारित असून त्याची संघर्षगाथा या चित्रपटाच्या निमित्ताने चाहत्यांपर्यंत पोहोचणार आहे. याच निमित्ताने तापसी सध्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. अशाच एका मुलाखतीत तापसीने हॉकी या खेळाला अद्यापही अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

‘खेळांमध्ये स्वारस्य असणाऱ्यांमध्ये मी स्वत:ची गणती करते. पण, ज्यावेळी संदीप सिंगच्या अपघाताविषयी आणि त्यांच्या पुनरागमनाविषयी मला माहिती मिळाली तेव्हा ही गोष्ट आपल्याला अद्यापही माहित नसल्यामुळे माझी मान शरमेने खाली गेली होती. ज्यामुळेच एका जिद्दीने मी या चित्रपटाच्या माध्यमातून एका खेळाडूचे खरे आयुष्य जगले’, असे तापसी म्हणाली. यावेळी तिने हॉकी या खेळाला फारशी लोकप्रियता मिळत नसल्याची खंतही व्यक्त केली.

‘एक खेळ म्हणून हॉकीमध्ये बरीच ताकद आहे. मुळात हा खेळ देशाच्या बऱ्याच दुर्गम भागांमध्येही अनेकांच्या आकर्षणाचा विषयही ठरु शकतो. किंबहुना एक काळ असा होताही की जेव्हा या खेळाला कमालीची लोकप्रियता होती. पण, दुर्दैवाने भारतात क्रिकेट इतकी लोकप्रियता आणि प्रेम इतर कोणत्याच खेळाला मिळत नाही ही एक शोकांतिकाच आहे’, असे म्हणत तिने खंत व्यक्त केली. ‘सूरमा’ या चित्रपटाच्या निमित्ताने एका खेळाडूची यशोगाथा आणि त्याचा संघर्ष सर्वांसमोर येईलच पण, त्यासोबच हॉकीप्रती क्रीडारसिकांच्या मनात पुन्हा एकदा प्रेम निर्माण होण्यास मदत होईल याबद्दलचा सकारात्मक दृष्टीकोन तिच्या वक्तव्यात पाहायला मिळाला.