भारतात आणखी एखादा हल्ला झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अमेरिकेची पाकला तंबी

0
447

नवी दिल्ली, दि.२१ (पीसीबी) – पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवादी संघटनांविरोधात कठोर भूमिका घ्यावी आणि भारतीय उपखंडातील तणाव वाढू नये याची दक्षता घ्यावी. भारतात आणखी एखादा दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी तंबीच अमेरिकेने पाकिस्तानला दिली आहे.

अमेरिकेतील व्हाइट हाऊसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने प्रामुख्याने जैश-ए- मोहम्मद आणि लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनांवर कारवाई करावी, अशी अमेरिकेची भूमिका आहे. आता जर भारतात पुन्हा एखादा दहशतवादी हल्ला आणि यामागे पाकमधील दहशतवादी संघटनेचे हात असल्यास पाकला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे सूत्रांनी सांगितले.

“पाकिस्तानने गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी संघटनांविरोधात भूमिका घेतली आहे. मात्र, त्यांनी आणखी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. पाकने यापूर्वीही दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांना नजरकैदेत ठेवले आणि काही महिन्यांनी त्यांची सुटका केली. काही नेत्यांना तर देशभरात फिरण्याची आणि जाहीर सभा घेण्याचीही मुभा आहे. त्यामुळे पाकिस्तानने आता ठोस आणि कठोर भूमिका घ्यावी”, असे व्हाइट हाऊसमधील सूत्रांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी संघटनांचे तळ आहेत. पाकिस्तानमधील आर्थिक स्थिती पाहता आणि एक जबाबदार देश म्हणून त्यांना जगात ओळखले जावे असे पाकला वाटत असेल तर त्यांनी आता या तळांवर कारवाई केलीच पाहिजे, असे अमेरिकेने पुन्हा एकदा सुनावले आहे.