Others

भारतातील ते असे प्राचीन रहस्यमयी मंदिर, “जिथे एका साधूंचा शाप लोकांना रात्री दगडामध्ये बदलतो”

By PCB Author

March 16, 2021

आपल्या भारत देशात गूढ, रहस्यमयी आणि प्राचीन मंदिरांची कमतरता नाही. असे एक मंदिर राजस्थानमध्ये आहे, जेथे संध्याकाळ होताच त्या मंदिराच्या आसपास लोक फिरकत सुद्धा नाहीत. लोक अक्षरशः पळून जातात. यामागील कारण असे आहे की, “या मंदिरात रात्री जो कोणी पण थांबतो, त्याचे दगडामध्ये रूपांतर होते.” असा येथील लोकांचा विश्वास आहे.

राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात हे मंदिर ‘किराडू मंदिर’ म्हणून ओळखले जाते. या मंदिरास राजस्थानचे ‘खजुराहो’ देखील म्हटले जाते. दक्षिण भारतीय शैलीत बांधलेले हे मंदिर वास्तुकलेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की या जागेचे नाव इ.स.पू. ११६१ मध्ये ‘किराट कुप’ होते.

किराडू ही पाच मंदिरांची मालिका आहे, त्यातील विष्णू मंदिर आणि शिव मंदिर (सोमेश्वर मंदिर) थोड्या चांगल्या अवस्थेत आहेत, तर उर्वरित मंदिरे अवशेषांमध्ये बदलली आहेत. ही मंदिरे कोणी बांधली हे कोणालाही ठाऊक नाही, परंतु मंदिरांची रचना पाहता असा अंदाज केला जातो की, ते गुर्जर-प्रतिहार राजवंश, संगम राजवंश किंवा दक्षिणेच्या गुप्ता घराण्याच्या काळात बांधले गेले असावेत.

किराडू मंदिराविषयी अशी समजूत आहे की, “बर्‍याच वर्षांपूर्वी एक सिद्ध साधू आपल्या काही शिष्यांसह येथे आले होते. एक दिवस ते आपल्या शिष्यांना तिथे सोडून कामानिमित्त बाहेर गेले. दरम्यान, त्यांच्या एका शिष्याची तब्येत अधिकच खालावली. त्यानंतर उर्वरित शिष्यांनी तेथील गावकर्यांकडे मदत मागितली, पण त्यांना कुणीही मदत केली नाही. नंतर जेव्हा सिद्ध साधू तिथे आले तेव्हा त्यांना सर्व गोष्टी कळल्या.यावर ते भयंकर संतापले आणि त्यांनी गावकऱ्यांना शाप दिला की, ‘सूर्यास्तानंतर या गावातील सर्व लोक दगड बनतील’.

शिवाय लोक म्हणतात कि, त्याच वेळी त्या गावातील एका महिलेने त्या साधूंच्या शिष्यांना मदत केली होती, म्हणून संन्यासीने त्या महिलेला ‘संध्याकाळ होण्यापूर्वी गाव सोडण्यास सांगितले व मागे वळून पाहू नका,’ असे बजावले. परंतु त्या महिलेने ऐकले नाही आणि मागे वळून पाहिले. त्यानंतर, ती एका दगडामध्ये बदलली. त्या मंदिरापासून थोड्या अंतरावरच त्या महिलेचा पुतळा देखील बसविला आहे.