भारताच्या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू बुकीच्या संपर्कात; बी. बी. मिश्रा यांचा गौप्यस्फोट

0
894

 

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – भारतीय क्रिकेटविश्वावर पुन्हा एकदा मॅचफिक्सींगच्या काळ्या ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. २०११ विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील एक खेळाडू हा बुकीच्या संपर्कात होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट माजी आयपीएस अधिकारी बी. बी. मिश्रा यांनी केला आहे. आयपीएल फिक्सींग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मिश्रा यांच्यावर चौकशीची जबाबदारी सोपवली होती. भारतीय संघातील ‘तो’ खेळाडू आणि बुकीमधल्या संभाषणाची टेप आपल्याला मिळणार होती, मात्र ऐनवेळी बुकीने ती टेप देण्यास नकार दिल्यामुळे आपण योग्य पद्धतीने चौकशी करु शकलो नसल्याचं मिश्रा म्हणाले. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला मिश्रा यांनी माहिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात आपला अहवाल सादर करण्यापूर्वी आपला बुकीसोबत संवाद झाल्याचे मिश्रा म्हणाले. मात्र चौकशीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे हे प्रकरण तडीस नेता आलं नसल्याचं मिश्रांनी स्पष्ट केले. आपल्या ४ महिन्यांच्या काळात मिश्रा यांनी तब्बल १०० जणांची चौकशी केली, ज्यामध्ये ३० खेळाडूंचाही समावेश होता. २०१३ आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश मुकुल मुद्गल यांच्या अहवालातही, मिश्रा यांच्या तपासातील काही ठळक बाबींचा समावेश होता. मात्र मिश्रा यांनी केलेल्या चौकशीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबाचे तपशील उघड करण्यात आले, खेळाडूंच्या चौकशीचे तपशील समोर आलेच नसल्याचे मिश्रा यांनी सांगितले.