भारताच्या वाटय़ाचे पाणी यापुढे पाकिस्तानला नाही- नरेंद्र मोदी

0
370

चंडीगड, दि. १६ (पीसीबी) –  नद्यांमधील भारताच्या वाटय़ाचे पाणी यापुढे पाकिस्तानत जाऊ दिले जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरयाणातील चरखी दादरी मतदारसंघात निवडणूक प्रचारसभेत स्पष्ट केले. पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या नद्यांमधील पाण्याचा प्रत्येक थेंब देशातील शेतकऱ्यांना दिला जाईल आणि त्या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात झाली आहे, असेही मोदी म्हणाले.

नद्यांमधील ज्या पाण्यावर भारताचा हक्क आहे ते पाणी गेल्या ७० वर्षांपासून पाकिस्तानमध्ये वाहून जात आहे, यापुढे असे होणार नाही, हे प्रकार मोदी थांबविणार असून हे पाणी तुमच्या घरात येईल, असेही पंतप्रधान म्हणाले. हे पाणी हरयाणा आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांचे आहे आणि भारत ते मिळविणारच, त्यासाठीचे काम सुरू झाले आहे, पाणी अडविण्यास आपण बांधील आहोत, तुमचा संघर्ष मोदी लढतील, असेही ते म्हणाले. अनुच्छेद ३७० च्या संदर्भाने मोदी म्हणाले की, काँग्रेसचे नेते जगभर अफवा पसरवत आहेत, मात्र त्यांनी आपल्याबद्दल अपशब्द वापरावे, परंतु देशाच्या पाठीत खंजीर खुपसू नये.