भारताच्या ‘या’ प्रसिद्ध मोटारसायकल रायडरचा भीषण अपघात

0
464

नवी दिल्ली, दि.०७ (पीसीबी) : भारताचा प्रसिद्ध मोटारसायकल रायडर सीएस संतोष याला सौदी अरेबियात सुरू असलेल्या डकार रॅली दरम्यान भीषण अपघात झाला असून, वैद्यकीयदृष्ट्या कोमात गेला आहे.

भारताचा ३७ वर्षीय रायडर संतोष हा जगातील सर्वांत मोठ्या अशा हिरो मोटोस्पोर्टस संघाकडून डकार रॅलीत सहभागी झाला असून, या रॅलीच्या चौथ्या टप्प्यात त्याला अपघात झाला. अपघातानंतर त्याला विमानाने रियाध येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असले, तरी डॉक्टरांनी तो कोमात असल्याचे सांगितले. त्याला चोविस तास देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

हिरो मोटेस्पोर्टसने टविट करून ही माहिती दिली असून, संतोषच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्याला ट्रॅकवरून बाहेर आणण्यात आले, तेव्हा तो शुद्धित होता. त्यानंतर त्याला तातडीने रियाधला नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तो कोमात असल्याचे सांगितले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचा अंदाज आहे.

या जागतिक स्पर्धेतील गेल्यावर्षीच्या याच टप्प्यात येथेच पावलो गोन्सावेल्सला अपघात झाला होता. अपघतानंतर त्याचे निधन झाले होते. त्यानंतर हिरो मोटोस्पोर्टसने या रॅलीतून माघार घेतली होती. या वेळच्या शर्यतीत १३५ कि.मी. झाल्यानंतर संतोषला अपघात झाला. मोटरस्पोर्टस क्रीडा प्रकारातील डकार रॅली ही सर्वात खडतर स्पर्धा मानली जाते. संतोष या स्पर्धेत सातव्यांदा सहभागी झाला होता. ही रॅली पूर्ण करणारा संतोष पहिला भारतीय रायडर ठरला होता. त्याने सर्वप्रथम २०१५ मध्ये ही कामगिरी केली आणि त्यानंतर दोनवेळा त्याने अशीच कामगिरी केली.

संतोषला यापूर्वी २०१३ मध्ये अबु धाबी डेझर्ट चॅलेंज स्पर्धे दरम्यान देखिल अपघात झाला होता. तेव्हा त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती.

काय असते डकार रॅली
२ ते १६ जानेवारी दरम्यान ही रॅली एकूण १२ टप्प्यात पार पडते. स्पर्धेत एकूण ७६४६ कि.मी. अंतर कापले जाते. यातील चौथा टप्पा हा सर्वात खडतर आणि एकूण ८१३ कि.मी. अंतराचा असतो. स्पर्धेला सुरवात झाल्यापासून म्हणजे १९७९ पासून २००७ पर्यंत ही स्पर्धा युरोपमधील विविध देशात पार पडली. सुरक्षेच्या कारणावरून २००८ मध्ये मौरिटानिया येथे ही स्पर्धा झाली नाही. त्यानंतर २००९ ते २०१९ दरम्यान ही स्पर्धा दक्षिण अमेरिकेत पार पडली. गेल्यावर्षीपासून ही स्पर्धा सौदी अरेबियात होत आहे.