भारताच्या अंडर-१९ संघाने सहाव्यांदा आशिया चषक पटकावला

0
396

ढाका, दि. ७ (पीसीबी) – भारताच्या अंडर-१९ संघाने सहाव्यांदा आशिया चषक पटकावला अंतिम सामन्यात श्रीलंकेवर १४४ धावांनी मात करत भारताच्या युवा खेळाडूंनी हा चषक जिंकला. बांगलादेशची राजधानी ढाक्यात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या अंडर-१९ संघाचा डाव १६० धावात गुंडाळला.

अंडर नाईन्टिन आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेला विजयासाठी ३०५ धावांचे  लक्ष्य दिले होते. मुंबईच्या यशस्वी जैसवालसह चार फलंदाजांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ५० षटकांत तीन बाद ३०४ धावांचा डोंगर उभारला.

यशस्वी जैसवालने ११३ चेंडूत आठ चौकार आणि एका षटकारासह ८५ धावांची खेळी उभारली. त्याने अनुज रावतसह सलामीला १२१ धावांची भागीदारी रचली. अनुज रावतने ५७ धावांची खेळी केली. कर्णधार प्रभसिमरन मानने नाबाद ६५, तर आयुष बदोनीने नाबाद ५२ धावा फटकावल्या.

३०५ धावांचा पाठलाग करता आलेल्या श्रीलंकेच्या संघाला मोठी मजल मारता आली नाही. हर्ष त्यागीने एकट्याने सहा फलंदाजांना माघारी धाडले. दोन विकेट घेऊन त्याला सिद्धार्थ देसाईनेही छान साथ दिली. तर मोहित जंगराने एका फलंदाजाला तंबुत पाठवले.