भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन 

0
1075

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – ‘अजित’ हे नाव सार्थ करून दाखविणारे भारताचे यशस्वी क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, संघप्रशिक्षक, संघटक अशा विविध भूमिका वाडेकर समरसून जगले. १९७१च्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमधील देदिप्यमान यशाचे श्रेय वाडेकर यांनाच दिले जाते. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र आणि एक कन्या असा परिवार आहे.

बुधवारी रात्री ९.३०च्या सुमारास त्रास जाणवू लागल्याने वाडेकर यांना वरळी येथील त्यांच्या निवासस्थानाहून जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्यांची प्राणज्योत मालवली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.

१९७१चे वेस्ट इंडिज आणि इंग्लंडवरील विजय हे भारताच्या आजवरच्या क्रिकेट वाटचालीतील मैलाचे दगड मानले जातात. तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम फलंदाज आणि स्लीपमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी वाडेकर यांची ख्याती होती. खेळाडू म्हणून भारतीय संघासाठी यशस्वी योगदान दिल्यानंतर भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी यशस्वी भूमिका बजावली. त्याव्यतिरिक्त अपंगांच्या क्रिकेटसाठीही त्यांचा मोठा सहभाग होता. स्टेट बँकेत सर्वोच्च पदावर पोहोचणारा क्रिकेटपटू म्हणजे अजित वाडेकर. नर्मविनोदी किस्से ऐकवून उपस्थितांना क्रिकेटच्या जुन्या दिवसांच्या आठवणींनी दंग करण्यात त्यांचा हातखंडा होता. शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जवळपास ६ वर्षे काम पाहिले. क्रिकेटपटू म्हणून निवृत्त झाल्यानंतरही क्रिकेट व मैदानांशी त्यांचे नाते कधीही तुटले नाही.