माजी क्रिकेटपटू आणि भाजप आमदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी; पाकिस्तानमधून…

0
208

नवी दिल्ली, दि.२५ (पीसीबी) : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा आमदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गंभीरनेच यासंदर्भातील तक्रार पोलिसांकडे केली होती. दोनवेळा गौतम गंभीरला धमकी देण्यात आली होती. दरम्यान, पोलीसांनी केलेल्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. गौतम गंभीरला धमकीचा मेल पाकिस्तानातून आला होता. गौतम गंभीरने आरोप केला होता की त्याला आयएसआयएस काश्मीरकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पण ज्या सिस्टीमद्वारे हा मेल पाठवला गेला त्याचा आयपी अ‍ॅड्रेस पाकिस्तानमध्ये सापडला आहे. दिल्ली पोलिसांनी गुगलकडून माहिती मागवली होती. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला धमकीचा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला होता. पाकिस्तानचा आयपी अ‍ॅड्रेसही सापडला आहे.

मंगळवारी रात्री गौतम गंभीरला पहिला ईमेल आला ज्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गंभीरने मंगळवारी रात्रीच तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र बुधवारी त्याला पुन्हा ‘काल तुला मारायचे होते, वाचलास, काश्मीरपासून दूर राहा’, असा ईमेल आला. या मेलसोबत गंभीरच्या घराबाहेरचा एक व्हिडिओही पाठवण्यात आला होता. ही धमकी आयएसआयएस काश्मीरने दिल्याचा गौतम गंभीरने आरोप केला आहे.