भारताचा बांगलादेशवर ३ गडी राखून विजय; सातव्यांदा  जिंकला आशिया चषक

0
330

दुबई, दि. २९ (पीसीबी) – दुबई  इंटरनॅशनल स्टेडियममध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत  अत्यंत चुरशीच्या झालेल्या  अंतिम लढतीत भारताने बांगलादेशवर ३ गडी राखत विजय मिळवून आशिया कपवर सातव्यांदा  नाव कोरले.  ६ चेंडूत ६ धावा पासून ते अखेरच्या एका चेंडूत १ धाव असा  श्वास रोखून धरणारा सामना  भारत जिंकणार की बांगलादेश जिंकणार की सुपरओव्हर होणार ? अशा सर्व शक्यता अखेरपर्यंत राखत हा सामना  भारताने जिंकला.   

बांगलादेशने  प्रथम फलंदाजी करत  २२२ धावांच्या लक्ष्य भारताला दिले. भारताकडून  रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी चांगली फलंदाजी केली. त्यानंतर मात्र भारताची फलंदाजी  ढेपाळली.  अखेर रवींद्र जाडेजावरच  सर्व जबाबदारी आली. पण तो बाद झाल्यानंतर  जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या १६ धावा काढताना भारताची चांगलीच दमछाक झाली.  भुवनेश्वर कुमार, केदार जाधव, कुलदीप यादव यांनी अखेरपर्यंत जिंकण्याची आशा ठेवत  विजयाला  गवसणी घातली.

दरम्यान,  लिटन दासच्या शतकाच्या जोरावर बांगलादेशने आशिया कप वन-डे क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतासमोर २२३ धावांचे लक्ष्य ठेवले.  भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला ४८.३ षटकांत २२२ धावांत रोखले. सुपर-फोरमधील लढतीत भारताने बांगलादेशचा डाव ४९.१ षटकांत १७३ धावांतच रोखला होता. या वेळी मात्र बांगलादेशला दोनशे धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले.