Banner News

भारताचा पाकिस्तानवर ‘वॉटरबॉम्ब’; तीन नद्यांचे पाणी रोखणार  

By PCB Author

February 21, 2019

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपली मुजोरी कायम ठेवत भारताकडे या हल्ल्याबाबत पुरावे मागितले आहेत. त्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार दणका दिला आहे. पाकिस्तानाला जाणारे पाणी रोखून त्यांची कोंडी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टि्वट करुन आज (गुरूवार) दिली आहे.

गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सिंधू जल करारातून भारताने माघार घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानला जाणारे पाणी आता भारत स्वत:साठी वापरणार आहे. पूर्वेकडच्या नद्यांचे पाणी आता जम्मू-काश्मीर आणि पंजाबसाठी वापरण्यात येणार आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

व्यास, रावी आणि सतलज या तीन नद्यांचे पाणी भारतातून पाकिस्तानला जाते. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची पाण्यासाठी भटकंती होईल. तीन नद्यातील पाणी प्रकल्पाद्वारे पाकिस्तान ऐवजी यमुना नदीत सोडण्यात येईल. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. याचा भाग म्हणून भारताने हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानावर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत असताना केंद्र सरकारने हा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा  भारत सरकारने आधीच काढून घेऊन पाकिस्तानला संभाव्य धोक्याची सुचना करून दिली होती.