भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल ला मोठ्या आनंदाने व उत्साहाने जिल्ह्यात साजरी होते. या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण येणार नाही या दृष्टिने काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री गिरीष बापट यांनी पोलीसांना दिल्या.

विधान भवन सभागृह येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी पोलिस अधिका-यांना त्यांनी या सूचना दिल्या.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार भिमराव तापकीर, संजय भेगडे, सुरेश गोरे, राहुल कूल, जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, पोलीस सह आयुक्त रविंद्र कदम, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे आदी उपस्थित होते.

श्री. बापट म्हणाले, पुणे जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून योग्य ती खबरदारी घ्यावी. या दरम्यान अवैधरित्य मद्य विकले जाऊ नये यासाठी देखील दक्षता घ्यावी. पाण्याच्या टँकरचे नियोजन करून पाणी पुरवठा कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. पुणे शहरासह ग्रामीण भागात निघणाऱ्या मिरवणुका सुरळीतपणे पार पडतील, असे नियोजन करावे.

बैठकीसाठी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. पुणे शहरासह इतर ठिकाणी मद्य विक्री, अवैध फलक प्रतिबंधित करण्यासाठी तसेच शहरातील विविध रस्त्यावर वाहतूक सुरळीत राखण्यासाठी घेण्यात आलेल्या दक्षतेबाबत देखील त्यांनी माहिती दिली.