भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२७ वी जयंती आहे. १८९१ साली मध्यप्रदेशातील महूमध्ये त्यांचा जन्म झाला. आज जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतातील जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे मोठे काम डॉ. आंबेडकरांनी केले. त्याच वेळी जागतिक पातळीवर शोषणमुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, सिद्धांत आणि प्रत्यक्ष चळवळ यातून त्यांचे योगदान मौल्यवान ठरले आहे. त्यांचे विचारधन आणि प्रत्यक्ष चळवळींमधला त्यांचा सहभाग, यातून ते सर्वांचेच प्रेरणास्त्रोत बनले.

बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी महू असली तरी मुंबई आणि नागपूर त्यांनी आपली कर्मभूमी मानली. म्हणूनच १९५६ मध्ये त्यांनी नागपुरात बौद्ध धम्म स्वीकारला आणि दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त लाखोंच्या संख्येने भीमबांधव नागपुरातील दिक्षाभूमीत येत असतात. तर मुंबईतल्या चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव उपस्थित राहणार आहेत.

तसेच, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद मध्य प्रदेशातील महू या आंबेडकरांच्या जन्मस्थळी आंबेडकरांच्या स्मारकाला आदरांजली वाहणार आहेत.