Videsh

भारतच दहशतवाद पसरवतोय; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

By PCB Author

February 22, 2019

इस्लामाबाद, दि. २२ (पीसीबी) – भारतच दहशतवाद पसरवत आहे असा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे. आम्ही स्वत: दहशतवादाविरुद्ध लढत असून कसलाही विचार न करता भारताकडून पाकिस्तानवर आरोप लावले जात असल्याचे पाकिस्तानी लष्कराने आज घेतलेल्या एका पत्रकार परिषद  म्हटले आहे.

आम्ही मागील बऱ्याच काळापासून दहशतवादाविरुद्ध लढत असल्याचे पाकिस्तानने सांगितले आहे. आमचा शेजारी देश असणाऱ्या भारताकडूनच दहशतवाद पसरवला जात आहे आणि कुलभूषण जाधव हा याच भारतीय दहशतवादाचा चेहरा असल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे. तसेच दरवेळेस निवडणुका आल्यावर भारतामध्ये दहशतवादी हल्ले कसे होतात असा सवाल पाकिस्तानने विचारला आहे. १९४७ पासून काश्मीरींवर भारत अत्याचार करत असल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानने नेहमीच शांततेसाठी प्रयत्न केले असून उलट भारतानेच बांगलादेश निर्मितीच्या वेळेस दहशतवाद केल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या हल्ल्याशी आमचा काहीच संबंध नसून भारत आमच्यावर खोटे आरोप करत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर कोणताही विचार न करता पाकिस्तानवर आरोप केले जात आहेत असे पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे. पुलवामा हे नियंत्रणरेषेपासून खूप दूर, हल्ला करणारा तरुण भारतीय होता, हल्ल्यात वापरण्यात आलेली गाडी भारतीय होती, दारुगोळा सर्व काही काश्मिरमधील होते, मग या हल्ल्याशी पाकिस्तानचा काय संबंध आहे असा सवाल पाकिस्तानने केला आहे. पुलवामा हल्ल्याचा पाकिस्तानला काहीच फायदा नसल्याचे सांगतानाच भारताकडून पाकिस्तानला एकटे पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे.