Maharashtra

भामा-आसखेडचे पाणी पुन्हा पेटले; जमावाकडून पोलीस कर्मचा-याला धक्काबुक्की

By PCB Author

September 01, 2020

चाकण, दि.१(पीसीबी) – भामा आसखेडचा पाणीप्रश्न पुन्हा डोके वर काढत आहे. स्थानिक शेतकरी आणि प्रशासन यांच्यामध्ये वारंवार वाद झाले आहेत. सोमवारी (दि. 31) देखील स्थानिक शेतक-यांनी भामा-आसखेड धरणातून सुरु असलेल्या पाईपलाईनच्या कामाजवळ येऊन घोषणाबाजी करत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केली. याबाबत 18 जणांना अटक करण्यात आली आहे.

देविदास पांडुरंग बांदल (रा. कासारी, ता. खेड), सत्यवान लक्ष्मण नवले (रा. वहागाव, ता. खेड), गजानन हरी कुडेकर (रा. अनावळे, ता. खेड), तुकाराम गोविंद नवले (रा. वहागाव, ता. खेड), धोंडिभाऊ बळीराम शिंदे (रा. आंबोली, ता. खेड), कचरू भगवंत येवले (रा. टेकवडी, ता. खेड), भागुजी दत्तू राजगुरव (रा. आखतुली, ता. खेड), संजय बबन पांगारे (रा. आखतुली, ता. खेड), दत्तात्रय सखाराम होले (रा. कासारी, ता. खेड), रोहिदास नामदेव जाधव (रा. अनावळे, ता. खेड), संदीप लक्ष्मण साबळे (रा. वाघू, ता. खेड), संतोष गणपत साबळे (रा. वाघू, ता. खेड), अण्णा महादू देव्हाडे (रा. देवतोरणे, ता. खेड), संतोष ममतु कवडे (रा. कोळीये, ता. खेड), मंदार विठ्ठल डांगले (रा. पराळे, ता. खेड), किसन बळवंत नवले (रा. वहागाव, ता. खेड), नामदेव बबन देशमुख (रा. देशमुखवाडी, ता. खेड), गौरव महादू देशमुख (रा. देशमुखवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल दांडगे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भामा आसखेड धरणातून पुणे शहराकडे पाणीपुरवठ्याची पाईप लाईन केली जात आहे. त्याचे काम सुरु आहे. खेड तालुक्यातील करंजविहीरे येथे या पाईपलाईनचे काम सुरु आहे. कामाच्या वेळी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आरोपी यांनी बेकायदा जमाव जमवून पाईप लाईनच्या कामाजवळ येऊन घोषणाबाजी केली. तसेच तिथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलीस शिपाई के यु कराड आणि सहाय्यक पोलीस फौजदार एस आर वाघुले यांना आंदोलकांनी धक्काबुक्की केली.

यामध्ये पोलीस शिपाई कराड यांच्या गणवेशाची बटणे तुटली. तर सहाय्यक फौजदार वाघुले यांच्या हाताला व पायाला मार लागला. आंदोलकांनी जलवाहिनीचे काम बंद पाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी 18 जणांना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.