भाडोत्री तट्टू चेतक घोड्याचा पराभव करू शकत नाहीत; अमित शहांचा विरोधकांना टोला

0
469

पुणे, दि. ८ (पीसीबी) – देशातील सर्वपक्षीय राज्यस्तरीय पराभूत नेते आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी एकत्र येत आहेत. हे नेते एकत्र आले तरी भाजपाला काही फरक पडणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत देखील भाजपाची सत्ता येणार असून नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला.

पुण्यात भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या स्वंयसेवकांशी संवाद साधताना विरोधी पक्षावर सडकून टीका केली. कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर अचूक काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्याचबरोबर भाड्याचे तट्टू चेतक घोड्याचा पराभव करू शकत नाही, अशा शब्दांत विरोधकांना टोलाही त्यांनी लगावला.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रदेश भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या स्वयंसेवकांशी शाह यांनी संवाद साधला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, सभाग्रुह नेते श्रीनाथ भिमाले आदी पदाधिकारी उपस्थित होते. शहा पुढे म्हणाले, ७० वर्षे सत्ता भोगलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आम्हाला साडेचार वर्षांचा हिशेब विचारतात. पण आम्ही मागील साडेचार वर्षांपासून त्यांनी ७० वर्षांत केलेली घाण साफ करत आहोत, हे त्यांना दिसत नाही.

सोशल मीडिया या विषयावर शहा म्हणाले की, या पुढील काळातील निवडणूक ही सोशल मीडिया मधून लढवली जाणार आहे. त्यामुळे या माध्यमाचा वापर करणारी प्रशिक्षित फौज आपल्याकडे तयार पाहिजे. फक्त मला सोशल मीडिया वापरता येतो असे करून चालणार नाही. तुम्हाला तुमचा हेतू साध्य करायचा असल्यास तुमच्या पोस्ट आणि मेसेज टोकदार असले पाहिजेत, असा सल्ला दिला.

आपली प्रत्येक पोस्ट उपयोगाची ठरणार असेल तरच ती पुढे पाठवण्यात अर्थ आहे. तसे नसेल तर मग अशा पोस्ट कुचकामीच ठरतील. यावर विशेष काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. २४ तास जागे राहून पक्ष आणि सरकारविरोधी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांसह सोशल मीडियावरील व्हायरल बातम्यांना योजनाबद्ध प्रत्युत्तर द्यावे लागेल.