भाजप सांस्कृतिक आघाडीच्या नाट्यसंगीत मैफीलीला चिंचवडमध्ये रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
526

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – आषाढी एकादशीचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडी आणि स्वरप्रतिभा व गानशिल्प फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील दत्त मंदिर सभागृहात स्वरवंदना हे अभंग व नाट्यसंगीत मैफीलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जेष्ठ संगीततज्ज्ञ मधु जोशी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. शिल्पा आठले यांच्या शिष्या स्वराली जोशी, अनन्या निवृत्ती यांनी “कार्यारंभी प्रथम पुजावे”हे गणेश स्तवन सादर केले. अविनाश लेले यांचे शिष्य गिरीष कलगट्टी “माझे माहेर पंढरी”, श्रुती देशपांडे यांनी “नाम घ्या हो मोरयाचे” ही गाणी सादर केली. मुख्य कलाकार अविनाश लेले व शिल्पा आठले यांचे गायन झाले. त्यांनी “संतभार पंढरीत, नाम विठ्ठलाचे, ज्ञानियांचा राजा, तिर्थ विठ्ठल”असे अभंग आणि “रागिणी मुख चंद्रमा, देवा घरचे, गगना गंध, नभ मेघांनी”ही नाट्यगीते सादर केली.

संवादिनी- उमेश पुरोहीत, तबला- धनंजय शाळीग्राम, पखवाज- चेतन मोरे, टाळ – आनंद टाकळकर यांनी साथसंगत दिली. यावेळी मिलिंद जोशी, अॅड. नगरसेवक मोरेश्वर शेडगे, संजीवनी पांडे, नंदू भोगले, संजय परळीकर आदी उपस्थित होते. सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष धनंजय शाळिग्राम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. अजित कुलथे, राहुल मोकाशी, सचिन राऊत, वैभव गोडसे, मधुकर बच्चे, रोहित कदम यांनी परिश्रम घेतले.