भाजप-शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब; सूत्रांची माहिती   

699

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – अखेर शिवसेना भाजप यांच्यामध्ये समझोता झाला असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभेसाठी २३- २५ जागा आणि विधानसभेसाठी १४४-१४४ जागांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनाला २३ आणि भाजपला २५ जागा असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. तसेच भाजपने शिवसेनेला पालघरची जागाही सोडल्याची माहिती  मिळत आहे. पालघरच्या जागेवर शिवसेना आग्रही होती. अखेर शिवसेनेने ही जागा पदरात पाडून घेतली आहे.

विधानसभेच्या जागावाटपाबाबतही यावेळी चर्चा झाली असून शिवसेनेचा ५०- ५० च्या फॉर्म्युला भाजपने  दोन पावले मागे घेत मान्य  केला आहे. त्यानुसार शिवसेना-भाजप विधानसभेची निवडणूक प्रत्येकी १४४-१४४ जागांवर लढणार आहेत. तसेच येत्या २-३ दिवसांत भाजप अध्यक्ष अमित शहा ‘मातोश्री’वर येणार आहेत.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन युतीवर शिक्कामोर्तब करतील, असे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये युती होणार की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. भाजप युतीसाठी आग्रही असून  शिवसेनेने गेल्या काही महिन्यापासून  प्रतिसाद  दिलेला नाही. तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनीही भाजपवरील टीकेची धार कमी केलेली नाही. तर आता युतीची चर्चा पूर्ण झाल्याने येत्या काही दिवसात युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.