भाजप शिवसेनेचे लोकसभेसाठी २३-२५ जागावाटपांचे सूत्र ?   

0
540

मुंबई, दि. १३ (पीसीबी) –  शिवसेना आणि भाजप  युती होण्यातील तिढा  सुटण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५  जागा, असे सूत्र निश्चित झाले आहे. तर विधानसभेच्या २८८ जागांपैकी १४५ जागांवर भाजप आणि १४३ जागा  शिवसेना लढवेल, असे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून लवकरच युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.  

शिवसेनेने १९९५ साली झालेल्या सूत्राप्रमाणे जागावाटप करण्याचा आग्रह धरला  होता.  मात्र, शिवसेनेची समजूत काढण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे.  शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने आपल्याकडील  काही जागा सोडण्याची तयारीही दाखवल्याचे समजते. युतीसाठी शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये  बंद दाराआड बोलणी सुरु होती.

दरम्यान, शिवसेनेला विदर्भात स्वारस्य नाही. त्याऐवजी शिवसेनेला मुंबई, पुणे आणि नाशिक परिसरातील जागांमध्ये अधिक रस आहे. सध्या पुणे आणि नाशिक शहरात शिवसेनेकडे एकही विधानसभेची जागा नाही.  त्यामुळे जागावाटपात येथील  भाजपच्या ताब्यातील काही जागा शिवसेनेसाठी सोडले जाण्याची शक्यता आहे.