भाजप-शिवसेना युती होईल का? दरेकर म्हणतात…

0
427

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद आहेच पण पक्षांतर्गत देखील विसंवाद असल्याचे दिसून येत असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. माध्यमाशी आज संवाद साधताना दरेकर म्हणाले की, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र म्हणजे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या अंतर्गत नेमकं काय चाललंय हे दाखवणारे पत्र आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कशाप्रकारे शिवसैनिकांना किंबहुना कार्यकर्त्यांना वागणूक दिली जाते त्यासंदर्भात प्रताप सरनाईक यांचे पत्र असावे, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.

मविआ मधील विसंवादाची अनेक उदाहरणं देता येतील, असे सांगताना दरेकर म्हणाले, खेड येथे पंचायत समितीचे सभापती शिवसेनेचे असताना राष्ट्रवादीच्या आमदारांनी अविश्वास दाखवत सत्तेवरून राजकारण केले. त्यावेळेस संजय राऊत यांनी राजकीय वक्तव्ये सुद्धा केली, आमदार राष्ट्रवादीचा असला तरी आम्ही त्यांच्या विरोधात लढू, असे वक्तव्य केले असताना एका बाजूला महाविकास आघाडी घट्ट आहे असं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला शिवसैनिकांना दिलासा, विश्वास देण्यासाठी विरोधात लढू असं सांगायचं. अशा प्रकारच्या दुहेरी भूमिका शिवसेनेकडून घेतल्या जात असल्याचं दिसून येत आहे.

परभणीचे खासदार बंडू जाधव, संजय जाधव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात गटतटीचे प्रकार होत आहे. त्यामुळे येथे प्रशासक नेमण्याचे त्यांनी या संदर्भात उद्धव ठाकरे यांना पत्र दिले. उद्धव ठाकरे यांनी हा त्यांचा राजीनामा थांबवून तुमच्या मनाप्रमाणे होईल, असे सांगितले, परंतु प्रत्यक्षात असं काहीही झालं नाही. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी नेत्यांनी तेथे प्रशासक नेमला असेही दरेकर यांनी सांगितले.
भाजप शिवसेनेची युती होईल का? असे विचारले असताना दरेकर म्हणाले, हिंदुत्व भाजपच्या विचारधारेचा भाग आहे. हिंदुत्वाला पूरक जर काही होत असेल तर ते स्वागतार्ह असेल. परंतु या पत्राच्या आधारावर उद्या युती होईल, असे काही समजायचे कारण नाही. राजकारणात भविष्यात किंबहुना उद्या काय होईल हे सांगता येत नाही. मी काही ज्योतिषी नाही. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्त्याला किंवा नेत्याला आपला पक्ष प्रमुख किंवा पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत असेल तर काही गैर नाही, प्रत्येक पक्षात मतमतांतर सुरूच असते, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.

मराठी मतदार हा विशिष्ट मतदार विभागासाठी किंबहुना पक्षासाठी राहीला नाही. भाजपचे 82 नगरसेवक मागील निवडणुकीत निवडून आले, त्यावेळेस मराठी मतदारांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनाधार भाजपला दिला. तसेच मनसेला सुद्धा मराठी माणूस मतदान करतो, त्यामुळे मराठी मतदार म्हणजेच फक्त शिवसेनेला मतदान करणार असे काही नाही. मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी जो पक्ष काम करतो त्याला मराठी माणूस जनाधार देत असतो. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकाराच्या काळात पाच वर्षाच्या कालावधीत मुंबईला अनेक विकासकामे दिली. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी त्यांनी अनेक दिशादर्शक भूमिका घेतल्या. भाजप मराठी माणसाच्या मागे उभा असतो आणि नेहमी उभा राहील, अशी भूमिका दरेकर यांनी स्पष्ट केली.