भाजप-शिवसेना कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार 

0
722

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना-भाजपने  तयारी सुरू केली आहे.  कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचे दर्शन घेऊन युतीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे.   २४ मार्चला कोल्हापुरात शिवसेना-भाजपा युतीची जाहीर सभा  होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

भाजप आणि शिवसेनेने लोकसभेच्या जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. लोकसभेसाठी शिवसेना २३ तर भाजप २५ जागा लढवणार आहे.  मात्र, काही जागांवरून शिवसेना आणि भाजप यांच्यात एकमत झालेले नाही. काही जागांबाबत रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री उशिरा ४८ मतदारसंघांचा आढावा घेतला. तसेच यावेळी कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.   नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई आणि पुण्यातही एकत्र प्रचारसभा घेण्याचे  ठरविण्यात आले.