Maharashtra

भाजप-शिवसेना काही लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांना डच्चू देणार?

By PCB Author

March 19, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – सोलापूर, मावळ, रायगड आदी जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने तगडे उमेदवार रिंगणात उतरवल्याने भाजप-शिवसेना युतीसमोर आव्हान उभे राहिले आहे. परिणामी युतीचे नेते काही विद्यमान खासदारांना डच्चू देण्याचा विचार करीत आहेत.

सोलापूरमध्ये काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना रिंगणात उतरवल्याने सध्याचे खासदार शरद बनसोडे यांच्याबाबत भाजप पुनर्विचार करीत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक निवडणुकांमध्ये शिवसेनेकडे राहिला आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. परंतु यावेळी राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना उमेदवारी दिल्यामुळे तेथे शिवसेनेपुढे मोठे आव्हान आहे. तेथील विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा तिकीट द्यायचे की नवा चेहरा द्यायचा, असा विचार शिवसेनेत सुरू आहे. कारण चांगला उमेदवार न दिल्यास ही जागा शिवसेनेच्या हातून निसटू शकते. अनेक मतदारसंघात राष्ट्रवादीने चांगले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे तेथे कडवी झुंज होईल.

उस्मानाबाद मतदारसंघ सातत्याने शिवसेनेकडे राहिला आहे. मात्र तेथील विद्यमान खासदार रवी गायकवाड यांच्या उमेदवारीबद्दलही अनिश्चितता आहे. गायकवाड यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात शिवसेना आहे. तर शिवसेना कोणाला उमेदवारी देते, त्यावर राष्ट्रवादी आपला उमेदवार ठरवणार आहे. बालेकिल्ला असलेला जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना बदलण्याचा विचार भाजपमध्ये सुरू आहे.