भाजप-मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण; चंद्रकांत पाटलांकडे राज ठाकरेंच्या ‘त्या’ क्लिप्स पोहोचल्या

0
208

पुणे, दि.२६ (पीसीबी) : गेल्या बराच काळापासून चर्चेत असलेली भाजप-मनसे युती प्रत्यक्षात येण्याच्या आशा आता पुन्हा दिसत आहेत. राज ठाकरे यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेवर आक्षेप असल्यामुळे भाजप मनसेशी युती करु शकत नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांच्या अलीकडच्या भाषणाच्या काही क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत.

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या पार्किंग लॉटमध्ये ओझरती भेट झाली होती. त्याचवेळी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविषयी माझी नेमकी काय भूमिका आहे, याच्या क्लिप्स तुम्हाला मी पाठवतो, असे राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते. त्यानुसार मनसेकडून या क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. त्यामुळे राज ठाकरे आगामी पालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी उत्सुक आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्याची घडामोड पाहता या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल पडले आहे. आता चंद्रकांत पाटील लवकरच भाजप आणि मनसेच्या युतीसंदर्भात घोषणा करतील, असे सांगितले जात आहे. नाशिकमधील राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील भेट बऱ्याच प्रयत्नानंतर घडून आली होती. दोन्ही नेते पार्किंग लॉटमध्ये 15 मिनिटं बोलत उभे होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या भेटीचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला होता. राज ठाकरे यांनी मला सांगितलं की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्याची लिंकही ते मला पाठवणार आहेत. आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

तुम्ही काही तरी सांगत होता आणि राज ठाकरे ऐकत होते. त्यांना नेमकं काय सांगत होता? असा सवाल चंद्रकांतदादांना करताच ते फक्त हसले. बरेच दिवस झाले भेटलो नाही, असं मी त्यांना म्हणत होतो. ते म्हणाले, मुंबईत कधी येतोस. आता पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाणार आहे. मुंबईत भेटतो त्यांना. आम्ही विद्यार्थी चळवळीत होतो. 40-42 वर्षापासूनची आमची मैत्री आहे. त्यानंतर भेट झाली नाही. आम्ही नाशिकमध्ये असूनही आमची भेट झाली नव्हती. आज झाली. तासभर भेटलंच पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.