Maharashtra

भाजप प्रवेशाबाबत इंदुरीकर महाराजांचा मोठा खुलासा

By PCB Author

September 14, 2019

संगमनेर, दि. १४ (पीसीबी) – संगमनेरमध्ये भाजपकडून  विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना प्रसिध्द कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी पूर्णविराम दिला आहे.   केवळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाखाचा धनादेश देण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेत भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. त्याचा राजकीय अर्थ काढू नये, असा खुलासा त्यांनी केला आहे.

मी समाजसेवेचा वसा हाती घेतला असून शेवटपर्यंत हा वसा पुढे नेणार आहे. मी राजकारणात प्रवेश करणार नसून कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा  इंदुरीकर महाराज यांनी केला आहे.

मला राजकारणात यायचे असते , तर मी कार्यक्रम संपेपर्यंत तिथे थांबलो असतो. मात्र समाजसेवेचे व्रत मी हाती घेतल्याने कधीही राजकारणात जाणार नाही.  मी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या बातम्या सध्या सुरू आहेत. त्यात काही तथ्य नसून या बातम्यांना मी पूर्णविराम देत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द केल्यानंतर कोणत्याही पक्षाची मफलर गळ्यात न घालता मी कार्यक्रमातून निघून गेलो होतो असे त्यांनी सांगितले.