भाजप नेते गिरीश महाजन अडचणीत; पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

0
521

पुणे, दि.५ (पीसीबी) : भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहे. काल रात्री गिरीश महाजन यांनी मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, पाच वर्षांपूर्वी संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत तानाजी भोईटे यांच्या गटाला नरेंद्र भास्कर पाटील यांनी निवडणुकीत पायउतार केल्यानंतरही भोईटे गट संस्थेवर ताबा सांगत असून दोन्ही गटांमध्ये आजवर अनेकदा संघर्ष झालेला आहे. मध्यल्या काळात भोईटे गटाला महाजन यांचा पाठींबा असल्याची चर्चा होती. याच अनुषंगाने दिवंगत नरेंद्र पाटील यांचे बंधू अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भोईटे गटाने विजय पाटील यांना पुण्यात बोलावून चाकुचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच याचवेळी व्हिडिओ कॉलवरुन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एका कोटी रुपयांची ऑफर दिली. जानेवारी 2018 मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी 8 डिसेंबर 2020 रोजी निंभोरा पोलिस ठाण्यात गिरीष महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर काल रात्री पुन्हा एकदा महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने महाजन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.