Banner News

भाजप नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे निधन

By PCB Author

September 26, 2020

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे कोरोना मुळे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. चिंचवड येथील एका आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची महिनाभरापासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली.

भोसरी परिसरातील प्रभाग क्रमांक ४ (दिघी-बोपखेल) मधून अनुसूचित जमाती प्रवर्गातून लक्ष्मण उंडे भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. पहिल्यांदाच ते निवडून आले होते. त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. ते लष्करी सेवेतून निवृत्त झाले होते. त्यांना महिन्याभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मधुमेह देखील होता.

कोरोनाने पिंपरी चिंचवड शहरातील तीन विद्यमान नगरसेवकांचा बळी घेतला आहे. माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक दत्ता साने, जावेद शेख आणि आता भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. माजी महापौर रंगनाथ फुगे, माजी नगरसेवक साहेबराव खरात, एकनाथ थोरात, लक्ष्मण गायकवाड या ४ माजी नगरसेवकांचे देखील कोरोनामुळे निधन झाले आहे.