Pimpri

भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांनी पिंपरी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याच्या कानफटात मारले

By PCB Author

October 25, 2018

निगडी, दि. २५ (पीसीबी) – भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या औषध फवारणी करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या कानफटात मारल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी दहाच्या सुमारास यमुनानगरमध्ये घडली. केंदळे विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून सफाई कर्मचाऱ्यांनी यमुनानगर पोलीस चौकीत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. मात्र पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप सफाई कर्मचाऱ्यांनी केला आहे.

गणेश जगताप असे मारहाण झालेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी दहाच्या सुमारास नेहमी प्रमाणे महापालिकेतील सफाई कर्मचारी गणेश जगताप हे औषध फवारणी करण्यासाठी यमुनानगर येथे गेले होते. यावेळी तेथील स्थानिक नगरसेवक उत्तम केंदळे यांनी जगताप यांच्या कानशिलात लगावली आणि हातही पिरगळला असा आरोप जगताप यांनी केला आहे. याप्रकरणी ते यमुनानगर पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी केंदळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे. सध्या या घटनेचा निषेध करत सफाई कर्मचाऱ्यांनी यमुनानगर पोलीस चौकीत आंदोलन सुरु केले आहे.

पीसीबीने यमुनानगर पोलीसांशी संपर्क साधला असता चौकशी केल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती दिली आहे.