भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनबाईचा वाद मिटला – पंकज तडस यांनी अखेर पूजाशी वैदिक पद्धतीनं केला विवाह

0
466

वर्धा, दि. ८ (पीसीबी) : भाजप खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस यांनी अखेर पूजाशी वैदिक पद्धतीनं विवाह केलाय. आपल्या घरीच अगदी साध्या पद्धतीनं हा विवाह सोहळा पार पडलाय. खासदार तडस यांची सून पूजा हिचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केला होता. त्यात तडस यांच्या सुनेनं आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर मारहाण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसंच चाकणकर यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. दरम्यान, तडस यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अखेर संध्याकाळच्या सुमारास पंकज तडस आणि पूजा यांचा विवाह पार पडला आहे.

पूजाकडून तक्रार मागे –
हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर पूजा यांनी आता आपली कुठलीही तक्रार नसल्याचं म्हटलंय. त्यांनी आपली तक्रारही मागे घेतली आहे. सकाळी मी खूप पॅनिक झाले होते. सकाळी माझ्या गाडीसमोरुन कुणीतरी गेलं त्यावेळी मला खूप भीती वाटली होती आणि त्यामुळे आपण ती तक्रार केली होती. आता पंकज यांच्याबद्दल आपली कुठलिही तक्रार नाही असं पूजा यांनी म्हटलंय.

‘काहींनी राजकीय सुपारी घेतली होती’ –
तर पंकज तडस यांनी आपण आधाही खूश होतो आताही आहोत. आपण यापूर्वीही पूजाला स्वीकारलेलं होतं आणि आताही स्वीकारतो आहे. पूजाशी मी लग्न केलं होतं. पण आता त्यांच्या इच्छेनुसार वैदिक पद्धतीनं लग्न केलं आहे. या प्रकरणात काही लोकांनी राजकीय सुपारी घेतली होती तो प्रश्न आता मिटला आहे. माझ्या वडिलांनी मला वर्षभरापासून बेदखल केलेलं आहे. माझ्या वडिलांचा आणि माझा कोणताही संबंध नाही. माझ्या वडिलांना आणि माझ्या परिवाराला गोवण्याचं काम सुरु आहे. ६ ऑक्टोबर २०२० ला माझं लग्न झालं होतं. त्याचं प्रमाणपत्र आपल्याकडे आहे. आता त्यांच्या विनंतीनुसार वैदिक पद्धतीनं लग्न केल्याचं पंकज तडस यांनी म्हटलंय.

पूजा तडस यांनी व्हिडीओत नेमकं काय म्हटलं होतं?
रुपाली चाकणकर यांनी आपल्या स्वत:च्या अकाऊंटवरुन व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांचा असल्याचा दावा चाकणकर यांचा आहे. हा केवळ 12 सेकंदांचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतील महिला म्हणते, “मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते”