Banner News

भाजप खासदार अमर साबळेंचे राजकीय कर्तृत्व; प्रचारात रिकाम्या खुर्च्यांसमोर ठोकले भाषण

By PCB Author

April 13, 2019

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी वालचंदनगरमध्ये गेलेले पिंपरी-चिंचवडचे रहिवासी आणि राज्यसभा खासदार अमर साबळे यांचे राजकीय कतृत्व सांगणारी एक घटना घडली आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करण्याची नामुष्की साबळे यांच्यावर आली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, राष्ट्रवादीने अमर साबळे यांची खिल्ली उडवली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने कांचन कुल यांना मैदानात उतरवले आहे. कांचन कुल यांच्या प्रचारासाठी वालचंदनगरमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत पिंपरी-चिंचवडचे रहिवासी आणि भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे हे मार्गदर्शन करणार होते.

परंतु, या सभेला हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नागरिक उपस्थित होते. स्टेजच्या समोर मोठ्या प्रमाणात खुर्च्या रिकाम्या होत्या. या रिकाम्या खुर्च्यांसमोरच खासदार साबळे यांनी आपले भाषण ठोकले. त्यामुळे ही सभा खासदार साबळे यांचे राजकीय कतृत्व सांगणारी ठरली. साबळे यांनी रिकाम्या खुर्च्यांसमोर केलेल्या भाषणाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हा व्हीडिओ ट्विट करून भाजप खासदार अमर साबळे यांची खिल्ली उडवली आहे.