भाजप आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा मंजूर  

0
423

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – भाजपमध्ये नाराज असलेले आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी (दि.२) ई-मेल करून पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. तर दुसऱ्यादिवशी विधानसभेत जाऊन त्यांनी अध्यक्षांकडेही आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर विभानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अखेर आज (सोमवार)  देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला आहे.  

देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, भाजपमध्ये ते नाराज होते. त्यांनी जाहीरपणे भाजपच्या धोरणांवर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी गांधी जयंतीदिवशी भाजपला सोडचिठ्ठी देत  त्याच दिवशी वर्ध्यात सेवाग्राममध्ये जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेटही घेतली होती.

दरम्यान, आशिष देशमुख यांना आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, यापूर्वी त्यांच्या काटोल मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केले आहे. देशमुख यांचे वडील रणजित देशमुख हे शरद पवार यांचे राजकीय विरोधक होते. त्यामुळे राष्ट्रवादी हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्याची शक्यता कमी आहे. तर दुसरीकडे देशमुख यांनी लोकसभा लढवण्याची तयारी दर्शवली आहे.