भाजप आमदाराच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवसेना नेत्या विरोधात गुन्हा

0
424

अलाहाबाद, दि. १६ (पीसीबी) – कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न करणाऱ्या भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा व तिचा पती अजितेश कुमार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामेश्वर दयाल असे मझौला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना नेत्याचे नाव आहे.

उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी हिने प्रेमविवाह केल्यानंतर वडिलांना व्हिडिओद्वारे संदेश पाठविला आहे. आपल्या जिवाला धोका असल्याचे तिने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना संरक्षण दिले. सुनावणीनंतर साक्षी व अजितेश कुमार न्यायालयातून बाहेर पडत असताना काही वकिलांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी अजितेशला मारहाण करण्यास सुरवात केल्यानंतर त्याच्या बचावासाठी साक्षी धावली. साक्षीने दलित मुलाशी विवाह केल्याचा राग राजेश मिश्रा यांच्या मनात आहे. वडिलांपासून जिवाला धोका असल्याने न्यायालयाने संरक्षण पुरविण्याची मागणी तिने केली होती. न्यायाधीश सिद्धार्थ वर्मा यांनी साक्षी व अजितेश यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला.

यावर शिवसेना नेता रामेश्वर दयाल यांनी साक्षी मिश्रा व तिचा पती अजितेश कुमार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. ज्यामुळे रामेश्वर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.