Maharashtra

भाजप आमदाराच्या जाचाला कंटाळून सावत्र बहीणाचा आत्महत्येचा प्रयत्न

By PCB Author

October 17, 2018

नंदूरबार, दि. १७ (पीसीबी) – भाजप आमदार उदयसिंग पाडवी यांच्या जाचाला कंटाळून त्यांची सावत्र बहीण राधा पाडवी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उदयसिंग पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत.

वडिलोपार्जित जमीन आणि रॉकेलचे लायसन्स आमदार पाडवी यांनी बळकावल्याचा आरोप राधा पाडवी यांनी केला आहे. उदरनिर्वाहासाठी इतर कोणतेही साधन नसल्याने राधा यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. राधा यांच्यावर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आमच्याकडे कोणत्याही प्रकारे उदरनिर्वाहाचे साधन नाही. आमदारांनी त्यांच्या पदाचा वापर करत वडिलोपार्जित जमीन आणि रॉकेलचे लायसन्स हे आपल्याकडे ठेवत कोणत्याही प्रकारे हिस्से वाटणी केलेली नाही. त्यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्येचा प्रयत्न केला, असे राधा पाडवी यांनी म्हटले आहे.