Maharashtra

भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही, माझ्या नावाची केवळ अफवा – कैलाश विजयवर्गीय

By PCB Author

May 21, 2019

नागपूर, दि. २१ (पीसीबी) –  भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे त्यांना पदावरून बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट करून भाजप अध्यक्षपदाबाबत आपल्या नावाची केवळ अफवा  आहे, आपण  अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही,  असे स्पष्टीकरण  भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी दिले आहे.

कैलास विजयवर्गीय यांनी सरकार्यवाह भय्याजी जोशी व संघाच्या अन्य पदाधिकाऱ्यांसह  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज (सोमवारी) येथे  भेट घेतली.  यानंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान  मोदी यांचा करिष्मा व अमित  शहा यांच्या नियोजनातून बंगालमध्ये कमळ दोन अंकी आकड्यात  फुलणार आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व बदलाची अजिबात  शक्यता नाही. शहांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष चांगली कामगिरी करत आहे, असे विजयवर्गीय म्हणाले.

दरम्यान, ‘एक्झिट पोल’नंतर विजयवर्गीय यांनी संघ नेत्यांसोबत गडकरी यांची भेट घेतल्याने   राजकीय वर्तुळाच तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यावर बोलताना विजयवर्गीय म्हणाले की,  ‘एक्झिट पोल’ आणि या भेटीचा काहीही संबंध नाही, अंत्योदय योजनेबाबत ही भेट घेतल्याचा त्यांनी यावेळी खुलासा केला.