भाजपा-शिवसेनेला जमलं नाही, ते राष्ट्रवादी करणार ?

0
364

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – सरकार स्थापण्यासाठी राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणानुसार राष्ट्रवादी सरकार स्थापण्याचा दावा करणार का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. अर्थात, यासाठी शिवसेनेला पाठिंब्याकरिता राजी करावे लागेल. राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला आज रात्री ८.३० पर्यंत सरकार स्थापण्याचा दावा करण्यासाठी वेळ दिली आहे. या निर्धारित वेळेत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना व अन्य छोट्या पक्षांचे सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. कारण शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यास १६० पेक्षा अधिक संख्याबळ होऊ शकते. तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्याकरिता काँग्रेसला अडचणीचे होते. पण राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यात काँग्रेसला काही अडचण येणार नाही.

राज्यपालांचे पत्र प्राप्त झाले असून, आधी काँग्रेसबरोबर चर्चा केली जाईल. त्यानंतर शिवसेना व छोट्या पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करू. यानंतरच सरकार स्थापण्याचा दावा करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गोंधळात सरकार स्थापन करण्याकरिता पत्र प्राप्त झाले नाही. एकूणच शिवसेनेला तोंडघशी पाडण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना राष्ट्रवादीला पाठिंबा देईल का, याची उत्सुकता असेल.

दरम्यान, राज्यपालांनी शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा फेटाळला नाही असं आम्हाला वाटत आहे, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव अविनाश पांडे यांनी दिली. केवळ शिवसेनेने समर्थन पत्र देण्यासाठी वाढवून मागितलेली वेळ त्यांनी नाकारली आहे. शिवसेना समर्थन पत्र घेऊन पोहोचल्यास राज्यपाल ते नाकारणार नाहीत, असंही ते म्हणाले. सध्या राज्यातील राजकीय परिस्थितीनुसार शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीची गरज भासणार आहे. सध्या महाशिवआघाडीवर कोणताही निर्णय झाला नसला तरी लवकरच यावर निर्णय घेतला जाईल, असं मत काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.