भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे भावनिक आवाहन

0
480

पिंपरी, दि.२५ (पीसीबी) – गेल्या आठवडाभरात कोकण परिसरात धुवांधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शेकडो नागरिक बेपत्ता आहे. आस्मानी संकटात अडकलेल्या कोकणवासीयांसाठी आता पिंपरी-चिंचवडकरांनी ‘ पुन्हा एक हात मदती’ द्यावा आणि मानवता धर्माचे पालन करावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे कोकणमुध्ये भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळये येथे दरड कोसळली होती. त्यातील मृतांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथे ५ आणि साखर सुतारवाडी येथे ६ जण दगावले आहेत. तळये गावातील ४३ ग्रामस्थ बेपत्ता आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पोसरे गावात दरडीच्या ढिगाऱ्याखालून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर १७ जण बेपत्ता आहेत. तेथील सात घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. कोकणात १६ जुलैपासून अतिवृष्टीमुळे आतापर्यंत १२५ जणांचा मृत्य, तर ५६ नागरिक जखमी झाले आहेत. बेपत्ता असलेल्या ६४ नागरिकांचा शोध सुरू आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

त्यामुळे कोकणवासींना आता मदतीची गरज आहे. तेथील नागरिकांना घराचा छतावर बसून रहावे लागत आहे. ज्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्यांना अन्न, औषधे आणि जीवनावश्यक वस्तुंची गरज आहे. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी ‘पुन्हा एक हात मदतीचा’ अशी साद घातली आहे.

कोकण विभागातील पुरपरिस्थितीत ज्या कोणास जीवनाश्यक वस्तुंची गरज आहे. त्यांनी सचिन फोंडके – 77 20 04 38 62 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहे आमदार महेश लांडगेंचे आवाहन?
कोकणवासीयांना हवा पुन्हा एक हात मदतीचा..!
कोकण, रायगडमध्ये मोठे अस्मानी संकट कोसळले आहे. आपल्या अनेक बांधवांनी यामध्ये जीव गमावला आहे. अद्यापही अनेक लोक संकटात आहेत. अन्नपाण्यावाचून हे जीव हतबल होऊन बसलेले आहेत. या सर्वांना सावरण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा मदतीचे हात होण्याची आता गरज निर्माण झाली आहे.

कोकण असो, रायगड असो किंवा आजूबाजूचा परिसर नेहमीच आपल्या स्वागतासाठी सज्ज राहिलेला आहे. आपण येथे अनेकदा पर्यटनासाठी जातो. येथील लोकांनी या परिसराने मुक्तहस्ताने आपले स्वागत केले. आपला पाहुणचार केला आहे. मात्र, आता हे आपले बांधव, हा आपला कोकण मोठ्या संकटात सापडलेला आहे. या आपल्या बांधवांना आणि या परिसराला सावरण्यासाठी आता आपण पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.