भाजपा वॉशिंग पावडर वापरत नाही, विकासाचे डॅशिंग रसायन आहे- देवेंद्र फडणवीस

0
357

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – भाजपा वॉशिंग पावडर वापरत नाही, विकासाचे डॅशिंग रसायन आहे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर दिले आहे. आमच्याकडे असलेले लोक भाजपात गेल्यावर स्वच्छ कसे होतात? मुख्यमंत्री या लोकांसाठी जी वॉशिंग पावडर वापरतात त्याचे नाव सांगावे अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्याच टीकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. भुसावळमध्ये झालेल्या महाजनादेश यात्रेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचाही समाचार घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपाच्या महाभरतीची नाही तर स्वतःच्या पक्षांना लागलेल्या महागळतीची चिंता करावी असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. तसेच तापी प्रकल्पासाठी ६ हजार कोटींची तरतूद केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमवर टीका करणाऱ्यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडे बोल सुनावले. परीक्षेत नापास झाला तर अभ्यास झालेला नाही हे कारण असते पेन कसा जबाबदार? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या घालत होते. आता अभिषेक मनु सिंघवी, जयराम रमेश यांच्यासारख्या नेत्यांनाही मोदींचे महत्त्व समजले आहे, तसेच ते इतरांनाही समजेल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.