भाजपा मध्ये मोठी फूट, आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार

0
712

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर भाजपामध्ये गटबाजीमुळे मोठी दुफळी निर्माण झाली आहे. राज्यातील महाआघाडीचे सरकार हे पुढील पाच वर्षे कायम राहणार याची खात्री पटल्याने आता भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. भाजपाचे सुमारे ४० पदाधिकारी, २९ नगरसेवक, ३५ वर माजी नगरसेवक आता राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, युवा नेते पार्थ पवार यांच्या संपर्कात हे सर्व सर्व लोक आहेत. राष्ट्रवादी की भाजपा तुम्हीच सांगा, असे म्हणत भाजपा युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष रवी लांडगे यांच्या समर्थकांनी सद्या व्हॉटस्अप ग्रुपवर मोहीम सुरू केली आहे, ती खूपच बोलकी आहे. ज्या भोसरी भूखंड प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना भाजपा मंत्रीमंडळातून जावे लागले, त्याच भोसरीतून आता भाजपाला सुरूंग लावण्यासाठी स्वतः खडसे शहरात येत आहेत.

२०२१ या नवीन वर्षात महापालिकेची सार्वत्रीक निवडणूक ही फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. अवघ्या वर्षावर निवडणूक असताना दुसरीकडे भाजपामध्ये तांडव सुरू आहे. शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात जबरदस्त शितयुध्दा रगंले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यात समेट घालून दिला, पण त्यानंतरही त्यांच्या समर्थकांमध्ये कुरबूर, धुसफूस सुरूच आहे. त्यात भाजपाची पूरती बदनामी झाली आणि जनाधार राष्ट्रवादीकडे सरकला आहे. त्याशिवाय दोघांच्या समर्थकांना महत्वाच्या पदांवर संधी देताना दोन-तीन वेळा निवडूण आलेल्या २७ जेष्ठ नगरसेवकांना एकही पद मिळाले नाही. आता ते सर्व नाराज नगरसेवक भाजपाला रामराम करायच्या मनस्थितीत आहेत. भाजपा निष्ठावंतांपैकी असंख्य कार्यकर्तेसुध्दा राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी रांगेत असल्याची चर्चा आहे.

भोसरी मतदारसंघातून बिनविरोध निवडूण आलेले भाजपाचे युवा कार्यकर्ते रवी लांडगे यांनी गेल्या आठवड्यात अजित पवार यांची भेट घेतली. आजवर त्यांना एकही महत्वाचे पद मिळाले नाही म्हणून ते नाराज आहेत. शहरात भाजपाची पाळेमुळे ज्यांनी रुजवली त्या दिवंगत अंकुश लांडगे यांचे रवि लांडगे हे पुतणे असून त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना तीव्र आहे. दरम्यान, रवि लांडगे यांच्याशी संपर्क केला असता, आपण खासगी कामासाठी अजित पवार यांना भेटलो, दुसरा कोणताही हेतु नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपाचे दुसरे नगरसेवक कैलास बारणे, नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष यांनीही अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. आणखी खूप मोठी टीम आहे, टप्याटप्यात नावे उघड होतील असेही सांगण्यात आले .

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी महापालिका ताब्यात घेण्यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संपर्क मोहीम सुरू केली आहे. त्याची कुठेही वाच्यता होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. प्रस्थापित राजकीय नेत्यांना बाजुला ठेवून नवा चेहरा राष्ट्रवादीला मिळवून द्यायचा असा अजित पवार यांच्या प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांची स्वतंत्र यंत्रणा कामाला लागली आहे. महापालिकेची मुदत आणखी एक वर्षे आहे आणि आताच पक्षांतर केले तर नगरसेवकपद बाद होते. त्यावर तोडगा म्हणून शेवटच्या टप्प्यात नगरसेवकांची एक फळीच राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार आहे, असे समजले.