भाजपा आमदार प्रणव सिंहचा हातात दारु आणि बंदुका घेऊन डान्स; व्हिडीओ व्हायरल

0
445

उत्तराखंड, दि. १० (पीसीबी) – उत्तराखंडमधील वादग्रस्त भाजपा आमदार प्रणव सिंह चॅम्पिअन पुन्हा एकदा चर्चेत आहेत. बेशिस्त आणि गैरवर्तवणुकीमुळे आधीच ते पक्षातून निलंबित आहेत. मात्र यावेळी ते चर्चेत येण्याचे कारण कोणताही बेशिस्तपणा किंवा हिंसाचार नाही आहे. तर हातात दारु आणि बंदूक घेऊन बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केल्याने ते सध्या चर्चेत आले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्रणव सिंह हातात बंदूक घेऊन नाचताना दिसत आहेत. यावेळी ते अश्लिल भाषेचा वापर करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पायाचे ऑपरेशन यशस्वीपणे पार पडल्यानंतर प्रणव सिंह आपल्या घरी परतले होते. आपल्या समर्थकांसह याचाच आनंद ते साजरा करत होते. नाचताना प्रणव सिंह यांनी एक, दोन नाही तर चार बंदुका हातात घेतल्या होत्या.

यावेळी त्यांचे समर्थकही कौतुक करताना ऐकू येत आहे. उत्तराखंडमध्ये हे फक्त तुम्हीच करु शकता असे ते म्हणत आहेत. आपल्या समर्थकांना उत्तर देताना फक्त उत्तराखंड नाही, तर संपुर्ण भारतात असे कोणी करु शकत नाही असे म्हणतात.