भाजपावाल्यांचा जेवणातही भ्रष्टाचार – दोन वेळचे जेवण, नाष्ट्यासाठी ४८० रुपये मोजले

0
375

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये भाजपाची सत्ता आहे. या दोन्ही ठिकाणी कोरोनाच्या नावाखाली भाजपाच्या नेत्यांनी केवळ भ्रष्टाचार आणि महापालिकांची लूट चालविली आहे. शासनाकडून आलेल्या धान्यातून जेवणाचे वाटप झाले मात्र भाजपाचे स्थानिक नेते त्यावरही स्वत:चे लेबल लावून राजकारण करीत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचारा कोरोनाच्या नावाखाली खरेदी करून केला आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. खरेदीतील सर्व भ्रष्टाचार . दहा दिवसांत पुराव्यानिशी जनतेसमोर सादर करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

वाघेर म्हणाले, शहरातील क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना योग्य पद्धतीने जेवण मिळत नाही, वायसीएममध्येही तशीच परिस्थिती आहे. बालेवाडी येथेही अडचणींचा डोंगर आहे. मात्र भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या बगलबच्च्यांना जेवणाची कंत्राटे देण्यातच सत्ताधार्‍यांना धन्यता वाटत आहे. एका दिवसाच्या एका व्यक्तीचे जेवण, नाष्टा आणि चहाचे तब्बल 480 रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. कोरोनामध्ये जेवणातही लूट करणे हाच खरा भाजपवाल्यांचा धंदा आहे. वायसीएमसाठीच्या मशीनरी, साहित्य, औषधे, सॅनिटायझर, मास्क, साबनासह इतर खरेदीतही प्रचंड भ्रष्टाचार करून या लोकांनी कोरोनाच्या महामारीतही मयतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील जनता यांना कधीच माफ करणार नाही. राज्य शासनाचे आदेश असतानाही आता स्थायी समितीच्या माध्यमातून वाढीव बिले, अनावश्यक कामांना मंजूरी देण्याचा सपाटा सुरू आहे. आयुक्तांनी राज्य शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी सत्ताधार्‍यांच्या दबावाला भिक घालून चुकीची कामे केल्यास त्यांच्याबाबतीत राज्य शासनाकडे आम्ही तक्रार करणार असून न्यायालयातही दावा दाखल करणार आहोत, असे वाघेरे म्हणाले.

वायसीएम मध्ये इतरांना वैद्यकीय सुविधा द्या –

सध्या वायसीएम रुग्णालय कोरोनासाठी केल्यामुळे सर्वरोग निदानासाठी महापालिकेचे एकही सर्व सुविधा असलेले रुग्णालय उपलब्ध नाही. डीवाय पाटील रुग्णालयात सुविधा दिल्याचे सांगण्यात येत असले तरी तेथील वस्तुस्थिती अत्यंत वाईट आहे. रुग्णांची हेळसांड सुरू आहे. महापालिकेने तात्काळ सर्वोपचार सुविधांचे एक रुग्णालय कोरोना व्यतिरिक्त आजारांसाठी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना सुविधा मिळेल. आम्हाला कोरोनासारख्या महामारीमध्ये राजकारण करायचे नाही. विना भ्रष्टाचार आवश्यक साहित्य घेण्यासही हरकत नाही. मात्र स्वस्वार्थापेक्षा जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची आवश्यक आहे. भाजपाने भ्रष्टाचार न रोखल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांसाठी झगडण्याची गरज भासल्यास आम्ही ते करण्यासही मागे पुढे पाहणार नसल्याचेही संजोग वाघेरे यावेळी म्हणाले.