भाजपाला मोठा दणका! अखेर ‘या’ जिल्हाध्यक्षांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

0
301

वर्धा, दि.१५ (पीसीबी) : जिल्हा भाजप मधील राजा माणूस म्हणून ओळख असणारे डॉ. गोडे यांनी राजीनामा देत आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे वर्ध्यात भाजपाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा देत असल्याचे पत्र पाठविले होते. त्यावेळी पाटील यांनी खासदार रामदास तडस यांच्या मार्फत गोडेंची समजूत काढली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्ष उदासीन आहे. बोलणाऱ्यास गप्प केले जाते. जनतेच्या प्रश्नाऐवजी भलत्याच गोष्टीवर वाद केल्या जातात, असे आक्षेप त्यांनी नोंदविले होते. मात्र यापुढे असे होणार नाही. दखल घेतली जाईल अशी हमी गोडेंना वरिष्ठ नेत्यांनी दिली होती

मात्र भाजप मध्ये घुसमट होत असल्याची भावना ते व्यक्त करतच होते. अखेर आज त्यांनी राजीनामा दिलाच. एका कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच के पटेल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,पालकमंत्री सुनील केदार, ज्येष्ठ नेत्या चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या उपस्थितीत डॉ गोडे यांनी काँग्रेस प्रवेश केला. दोन वर्षांपासून ते अध्यक्ष होते. त्या पूर्वी २०१४ मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. काँग्रेसचे खासदार राहिलेल्या संतोषराव गोडे यांचे चिरंजीव असलेल्या डॉ गोडे यांनी आरोग्य खात्यात वरिष्ठ पद भूषवून राजीनामा देत काँग्रेसचे राजकारण सुरू केले होते. मात्र संधी न मिळाल्याने त्यांनी बसपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविली होती. पुढे भाजपामध्ये प्रवेश केल्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी खेडोपाडी भाजपा मजबूत करण्याचे कार्य केले. संघनिष्ठ भाजपा नेतेही पक्ष चालवावा तो गोडेनीच, अशी प्रशस्ती देत. त्यांच्या निर्णयास एकही नेता विरोध करीत नसे. असा लोकप्रिय नेता पक्ष सोडून गेल्या बद्दल काहींनी खंत व्यक्त केली. तर पटोले म्हणाले की गोडे यांचा सर्व तो सन्मान राखून त्यांना जबाबदारी दिली जाईल.