भाजपात आलेल्यांचीही ईडी चौकशीची शक्यता; चंद्रकांत पाटीलांचा गौप्यस्फोट

0
350

पुणे, दि. २४ (पीसीबी)-  ‘सक्तवसुली संचालनालय (ईडी) ही स्वायत्त संस्था असून, भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचीही चौकशी होऊ शकते,’ असा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही माहिती दिली. भाजपमध्ये प्रवेश करण्यात केलेल्यांची चौकशी होत नसल्याचा आरोप होत असल्याबाबत विचारणा करण्यात आली असता, पाटील म्हणाले, ‘ईडी स्वायत्त संस्था आहे. त्यांच्याकडून दोन ते तीन वर्षे रेकी केल्यानंतरच चौकशी केली जाते. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचीही चौकशी होऊ शकते.’

‘पोलिसांच्या मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी वसतिगृह बांधून देण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपये देण्यात येणार आहेत़ हा निधी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत दिला जाणार आहे़ पालखी तळांच्या ठिकाणी हर्बल औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णांचे कपडे, बेडशीट धुवण्यासाठी ससून रुग्णालयाला धुलाई यंत्रासाठी एक कोटी ३० लाख रुपये देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे,’ असेही पाटील म्हणाले.

‘डीजेच्या बाबतीतील नियमांचे पालन न केल्यास संबंधित मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करावे लागतील. पोलिसांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर कोर्टाकडून कारवाई होऊ शकते. कोल्हापूर जिल्हा डॉल्बीमुक्त झाला असून, पुणे जिल्हाही डॉल्बीमुक्त होऊ शकतो,’ असेही पाटील म्हणाले. या बैठकीला खासदार गिरीश बापट, अमर साबळे, महापौर मुक्ता टिळक, कामगार राज्यमंत्री संजय भेगडे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी आदी उपस्थित होते.