भाजपाच्या या आमदाराच्या लग्नाची होणार चौकशी

0
497

पुणे, दि. २३ (पीसीबी) : पुणे शहरामधील कोरोनाचे सावट अद्याप दूर झालेले नसतानाही भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या शाही लग्नसोहळ्यात सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यावरून सर्वसामान्यांना वेगळा आणि लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. या पार्श्‍वभूमीवर सातपुते यांच्या लग्न सोहळ्यात नियमांचे पालन झाले की नाही, याची चौकशी करण्याचे आदेश पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.

राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सातपुते यांचा डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे रविवारी शाही लग्नसोहळा संपन्न झाला. या लग्न सोहळ्यासाठी पुण्यासह राज्याच्या विविध भागातून नागरिकांसह राजकीय पक्षांचे नेत्यांनी हजेरी लावली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे सर्व आमदारही यावेळी उपस्थित होते.

कोरानाच्या अटकावासाठी प्रशासनाकडून नागरिकांवर मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसींगचे पालन करणे याबाबत वारंवार आदेश देऊन पोलिसांकडून कारवाई केली जाते. तसेच सर्वसामान्यांना लग्नसोहळा किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमांसाठी 50 जणांनाच परवानगी दिली जाते. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वसामान्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. असे असतानाही आमदार सातपुते यांच्या लग्नात मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सींगचे पालन झाले नाही. याबाबतचे व्हिडिओ, छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल होऊन, त्याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.