भाजपाच्या पहिल्या यादीत खडसे, तावडेंना स्थान नाही

0
541

मुंबई, दि. १ (पीसीबी) – राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मंगळवारी १२५ उमेदवारांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. यामध्ये देवेंद्र फडणवीस नागपूर पश्चिम तर चंद्रकांत पाटील हे कोथरुडमधून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. मात्र, भाजपातील पहिल्या फळीतील अनेक दिग्गज नेत्यांना या यादीत स्थान न मिळाल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधान आले आहे. यामध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश नाही.

भाजपाकडून तब्बल १२ विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील १२५ उमेदवारांच्या  यादीत एकनाथ खडसे यांचे नाव नाही. त्यामुळे खडसे विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यामुळेच त्यांचे नाव तूर्त जाहीर झाले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपाध्ये आलेले माजी मंत्री गणेश नाईक यांचे नावही पहिल्या यादीतून वगळण्यात आले आहे. तसेच विनोद तावडे प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव पहिल्या यादीत नाही.

भाजप-शिवसेना युतीची बोलणी रखडल्याने भाजपने अद्याप उमेदवार यादी जाहीर केली नव्हती. मात्र, सोमवारी रात्री महायुतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज अखेर शिवसेना आणि भाजपाच्या महायुतीचा फॉर्मुला ठरला आहे. यामध्ये शिवसेनेला १२४ तर भाजपा १६४ जागांवर निवडणुका लढवणार आहेत. भाजपाच्या कोट्यातून मित्रपक्षांना जागा देण्यात येणार आहेत. भाजपाच्या या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये १२ महिला आमदारांचा समावेश आहे. १२ मतदारसंघांची आदलाबदल करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पुण्यातील आठही जागा भाजपाच्या वाटेला तर मुंबईतील १९ जागा या शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत.