भाजपाचे टेन्शन या राज्यात वाढणार, जवळपास 100 जागांचा तोटा होण्याची शक्यता..

0
416

 नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) : पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानं आता महत्त्वाचे मानले जाणारे निवडणुकांचे सर्वेही समोर येऊ लागले आहे. या सर्वेतून भाजपची चिंता वाढवणारे आकडे हाती आले आहेत. आगामी पाच राज्यांपैकी तीन राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. त्यापैकी किती राज्यात भाजप पुन्हा आपली सत्ता राखून शकेल, हे दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अशातच अंतिम टप्प्यात महत्त्वाचे मानले जाणारे सर्वे जे आकडे सांगत आहेत, ते भाजपला विचार करायला भाग पाडणारे असे आहेत.

नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार युपीमध्ये भाजपला सत्ता राखण्यात यश मिळू शकेल. मात्र त्यांच्या जागा लक्षणीय प्रमाणात घटतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे गोव्यातही भाजप पुन्हा कमळ फुलवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र नुकत्यात गोव्यातील भाजपच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्यानं तिथल्याही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर मणिपुरात भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळू शकेल, असं अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे.

राज्यनिहाय सर्वेक्षण काय सांगतंय?
उत्तर प्रदेश – 2017 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेसचा सुपडा साफ करत भाजपनं 300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला होता. मोदी लाटेत स्वार झालेल्या भाजपने 2017 च्या निवडणुकीत 47 वरुन थेट 312 जागांवर मजल मारली होती. तर अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीची 224 वरुन 47 जागांवर घसरण झाली होती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जवळपास 100 जागांचा तोटा होण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये भाजपनं नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती. तर यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचं परीक्षणही मतदार करत असल्याचं या सर्व्हेतून पाहायला मिळत आहे. यंदा भाजपला 403 पैकी 223 ते 235 जागा मिळण्याची शक्यता या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. तर 2017 च्या तुलनेत समाजवादी पार्टीला 100 जागा अधिक मिळून, 145 ते 157 जागांवर विजयाचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर काँग्रेसला मात्र केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावं लागेल असं या ओपिनियन पोलमध्ये सांगितलं गेलं आहे.

गोवा – 2022 मध्ये भाजपनं 22 जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलंय. ते सत्यात उतरेल असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. मात्र स्थानिक पत्रकारांच्या म्हणण्यानुसार भाजपला 20 आमदार निवडून आणतानाही प्रचंड मेहनत घ्यावी लागणार असल्याचं बोललं जातंय. तर दुसरकीडे काँग्रेसला मोठा फटका बसेल असा अंदाज वर्तवला जातोय. काँग्रेसला अवघ्या चार ते आठ जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे एमजीपी आणि तृणमूल काँग्रेस मिळून दोन ते सहा जागा जिंकू शकतात. तर आम आदमी पार्टी तब्बल पाच ते नऊ जागी जिंकू शकते, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. अपक्ष आमदार गोव्यात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत आले आहे. त्या पार्श्वभूमीवर चार अपक्ष आमदार जिंकू शकतात, अशीही शक्यता सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे.

मणिपूर – मणिपुराच रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे. मणिपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना होईल, अशी शक्यता असून भाजपला 23 ते 27 तर काँग्रेसला 22 ते 26 जागा मिळतील अशी शक्यता आहे. तर एनपीएफला दोन ते सहा तर अपक्ष पाच ते नऊ जागी निवडून येण्याची शक्यता सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे.

पंजाब – पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप ला 40 टक्के तर काँग्रेसला 36 टक्के मतं मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आम आदमी पार्टीला 52-58 इतक्या जागा मिळतील, तर काँग्रेसला 37 ते 43 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला एक ते तीन जागी विजय मिळू शकतो, अशी शक्यता आहे. तर अकाली दल 17 ते 23 जागी बाजी मारेल, असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे.

उत्तराखंड – उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपात अटीतटीची लढत होईल अशी शक्यता आहे. वर्तवण्यात आलेल्या अंदाजनुसार, भाजपला 39 तर काँग्रेसला 37 टक्के मत मिळू शकतात. दरम्यान, आपला तेरा तर इतरांना अकरा टक्के मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कुणी केला सर्वे?
एबीपी न्यूज सी वोटरनं पाचही राज्यांच्या विधानसबा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण केलं आहे. पाच राज्यात येत्या महिन्यभरात निवडणुका पार पडणार असून त्यांचा निकाल मार्च महिन्याच्या 10 तारखेला लागणार आहे. दरम्यान, आता पाचही राज्यात आचारसंहिता लागू झाली असून राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. अशातच वाढत्या कोरोनामुळे प्रचारसभा, ऑफलाईन रॅली, या सगळ्यावर बंदी घालण्यात आल्यानं सर्वच राजकीय पक्षांना ऑनलाईन प्रचारावर भर द्यावा लागतोय. त्यामुळे आता डिजिटल प्रचाराची चढाओढ राजकीय पक्षांमध्ये सुरु झालेली आहे. अशातच हाती आलेल्या सर्वेक्षणानुसार राजकीय पक्ष नेमकी काय रणनिती अखेरच्या टप्प्यात ठरवतात, हे पाहणंही औत्युक्याचं ठरणार आहे.